Thursday, April 20, 2017 | 8:21:00 AM
अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया आहे. अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करतात व त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे घागरीयेवढे मडके आणून, त्यात पाणी भरुन त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.
पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानतात. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे..
सदोदित कृपादृष्टि ठेवणार्या मूर्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी व वैभवलक्ष्मी यांची प्राप्ति होते. अक्षयतृतिया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून मूर्तिकेची उपासना करण्याचा दिवस.
मातीत आळी घालणे व पेरणी : पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय तृतीया येते. वर्षाऋतूच्या आगमनाचा, म्हणजे मृग नक्षत्राचा व या तिथीचा घनिष्ट संबंध आहे. (घनिष्ट संबंध म्हणजे शुद्ध किंवा चांगल्या हेतूने परस्परांशी असेलेले घट्ट संबंध.) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे अक्षय तृतीयेपर्यंत मशागत करण्याचे काम पूर्ण करावे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) अक्षय तृतीयेच्या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मूर्तिकेचे कृतज्ञ भाव ठेवून पूजन करावे. त्यानंतर पूजन केलेल्या मूर्तिकेमध्ये आळी घालावीत व त्या आळयांमध्ये बियाने पेरावे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही. त्यामुळे वैभव प्राप्त होते. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार बाजूला काढून घेऊन उरलेले धान्य स्वत:ला व इतरांना पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवणे.)
अक्षय तृतियेच्या दिवशी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करण्याचे महत्त्व : अक्षय तृतियेच्या दिवशी राजाने किंवा प्रजेच्या पालनपोषणाची जबाबदारी असणार्यांनी सामूहिकरीत्या राजवाड्यात किंवा सामूहिक पूजाविधीच्या ठिकाणी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तिभावाने पूजन करावे. यामुळे प्रजा सुखी व समृद्ध होते. लक्ष्मीदेवीची कृपाच आपल्यावर होत नाही; कारण लक्ष्मीदेवी ही श्रीविष्णूची शक्ति आहे. जेथे श्रीविष्णूलाच बोलावणे नाही, तर त्याच्यासोबत किंवा त्याच्यात असणारी त्याची शक्ति कशी बरे पूजास्थळी येऊन कृपा करेल ? म्हणून कोणत्याही रूपातील श्रीलक्ष्मी पूजनाच्या वेळी श्रीविष्णूला प्रथम आवाहन करावे व नंतर श्रीलक्ष्मीलाही आवाहन करावे. त्यामुळे उपासकाला लक्ष्मीतत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होतो.
Posted By