Wednesday, January 25, 2017 | 7:46:00 AM
प्रजासत्ताक दिवस
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा दरवर्षी जानेवारी २६ रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.
२६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवसांपैकी एक आहे. ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी)समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.
या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो.
नवी दिल्ली येथे होणार्या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.
संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरु होताच पंतप्रधान ध्वजारोहण करतात व २१ बंदुकांची सलामी दिली जाते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.
Posted By