Wednesday, September 7, 2016 | 8:05:00 AM
घटस्थापना
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, ह्यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात. नवरात्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. ह्या नवरात्रीत देवीपुढे अखंड दिप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची छान छान भजने, स्त्रोत्र म्हटली जातात.
दोन पत्रावळी घेऊन त्यात एक परडी ठेवतात. परडीत काळी माती घालतात त्यात एक सुगड ठेवतात. त्याला कुंकवाची पाच किंवा सात बोटे काढतात. त्या सुगडाच्या तोंडावर नऊ विड्यांची पाने लावतात. त्यावर एक नारळ म्हणजेच श्रीफळ ठेवतात. त्या श्रीफळालाच देवीचा मुखवटा मानून हळद कुंकू लावतात. हार वेणी गजरा घालतात. घटा खालच्या काळ्या मातीत सात प्रकारची धान्य पेरतात.ह्या घटाजवळच अखंड नंदादीप लावतात. त्या दिव्याची काळजी घेतली जाते. दीप म्हणजे प्रकाश अन् प्रकाश म्हणजे ज्ञान, तसेच ह्या घटावर फुलांच्या माळा सोडल्या जातात. सकाळ-संध्याकाळ देवीची मनोभावे पूजा केली जाते. भक्ती केली जाते. उपासना केली जाते. नवरात्रातली ही देवी उपासना प्रामुख्याने रात्री करतात. कारण रात्रीची वेळ ही उपासनेला उत्तम असते. रात्री मन शांत स्थिर असते. त्याची एकाग्रता तादात्म्य भाव लवकर साधतो. एकेका दिवसानं घटा खालच्या मातीत पेरलेलं धान्य हे पाणी आणि अखंड दिव्याची उष्णता ह्याने अंकुरते - हळू हळू वाढू लागते. तेच त्या देवीचं घटावरचं दर्शन असतं. आपल्या महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अर्धे पीठ अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. येथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते. देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून येतात. देवीला साडी-चोळी, पीठा-मीठाचा जोगवा, ओटी अर्पण करतात व सुखाचे वरदान मागतात.ह्या घटासमोर बसून उपासना करणाऱ्याचे मन शांत प्रसन्न व स्थिर होते. देवीची त्या भक्तावर कृपा होते. त्याला सुख, शांती अन् समाधान लाभते. नवव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवचंडीचे होम करतात.ह्या नवरात्र उत्सव काळात देवळातून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात. ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, मंगल आणि कल्याण करणारी आहे. ह्या शक्तीचे पूजन देशभरात केले जाते.ही शक्ती देवता देशभरांत अन् वेगवेगळ्या भागांत विविध नावांनी ओळखली जाते. ह्या उत्सवाला सुद्धा सध्या सार्वजनिक स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. मुलींना आवडणारा हादगा हा सुद्ध ह्याच दिवसात करतात. मुली पाटावर हत्ती काढून त्याचे भोवती फेर धरतात. हादग्याची गाणी म्हणतात. नवनव्या खिरापती केल्या जातात. नवरात्रीला सध्या जे सार्वजनिक स्वरुप आले आहे त्यामध्ये मुले मुली नऊ दिवस गरबा खेळतात. तसेच विविध मनोरंजनाच्या स्पर्धा महिलांसाठी भरविल्या जातात. मुलां-मुलींसाठी अनेक स्पर्धात्मक कार्यक्रम राबविले जातात. शेवटच्या दिवशी देवीची फार मोठी मिरवणूक काढली जाते. शक्ती उपासनेचा हा नवरात्रीचा उत्सव फार महत्त्वाचा आहे.
Posted By