Tuesday, August 23, 2016 | 10:38:00 AM
विजयादशमी
आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येतो.
'दसरा' साजरा करण्यामागील शास्त्र व इतिहास 'दसरा' हा प्रारंभी एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळयात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावेळी शेतकरी हा उत्सव साजरा करत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दसर्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वहातात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथादेखील या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले आणि इतिहासकाळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरला.
दस-याच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला भगवान रामचंद्राने रावणावर मात करण्यासाठी ह्याच दिवशी प्रस्थान केले ह्याच दिवशी रघुराजाला घाबरुन कुबेराने शमी वृक्षावर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाडला वनवास संपल्यावर पांडवांनी या वृक्षाच्या ढोलीत ठेवून दिलेली शस्त्रास्त्रे पुन्हा धारण केली यामुळे शूर लोक या दिवशी आपल्या शस्त्रास्त्रांची पूजा करतात तर व्यावसायिक लोक आपापल्या कामाची हत्यारे यंत्रसामुग्री यांची पूजा करतात या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर सीमोल्लंघनास जातात तेथे शमीच्या व आपट्याच्या झाडांची पूजा करुन सूवर्णमोहरांचे प्रतिक म्हणून शमीची पाने एकमेकांस दिली जातात.
श्रीरामाने याच दिवशी लंकाधिपती रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी दक्षिणेस कूच केले. त्याला यशही मिळाले. त्याच्या विजयाबद्दल आनंदोत्सव म्हणूनही हा सण साजरा केला जातो. राजपूत सरदारही याच मुहूर्तावर लढाईवर निघत असत. मराठ्यांच्या स्वार्याही याच दिवसांपासून सुरू होत. पेशवे आपल्या आश्रित संस्थानिकास दसर्याच्या दिवशी दरबार भरवून मानाचा पोशाख देत. ब्रिटिश अधिकार्यांनीही काही काळ ही प्रथा सुरू ठेवली होती.
दसरा शेतकर्यांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. कारण नवरात्रात नऊ दिवसात उगवलेली रोपे शेवटच्या दिवशी दसर्यास वाहतात. तसेच शेतकरीही शेतात तयार झालेल्या भाताच्या लोंब्या आणून त्याची पूजा करतात. प्रवेशद्वारावरही टांगतात.
याशिवाय घरातील विविध भांड्यांना धान्याची कणसे बांधण्याची प्रथा कोकणात आहे. बंगालमध्येही अशाच प्रकारचा एक विधी होतो. तेथे स्त्रिया गवताची पेंढी धान्याच्या कोठारास बांधतात. त्याला बावन्न पोटी असे म्हणतात. म्हणजे हे धान्य बावन्न पट होऊ दे. त्याचप्रमाणे भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे धान्याला व ते पिकवणार्या शेतकर्याला मोठा मान आहे. धान्य उदंड प्रमाणात यावे यासाठी ईश्वराला साकडे घालण्यात येत असे. या धान्याच्या रक्षणासाठी पूर्वीच्या काळी राजा व प्रजा झटत असे. कारण धान्य असले तर जगता येईल. अन्यथा नाही. हे त्यांना माहित होते. म्हणून धान्याला सोन्याची उपमा दिली जात असे. वर्षाकाल संपताच राजा प्रजाजनांबरोबर गावाच्या सीमेपर्यंत जाऊन नविन धान्य घरात आणत असे.
Posted By